पौलाचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र
1
1 आपले परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,
पौल, सीलास*सीलास किंवा सिल्वानस व तीमथ्य यांच्याकडून:
तुम्हाला कृपा व शांती असो.
थेस्सलनीका मंडळीच्या विश्वासाबद्दल उपकारस्तुती
2 आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो. 3 आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
4 परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे. 5 कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे. 6 पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले; 7 आणि म्हणूनच मासेदोनिया व अखया येथील सर्व विश्वासणार्यांसाठी तुम्ही आदर्श झाले. 8 प्रभूचा संदेश तुम्हाद्वारे केवळ मासेदोनिया व अखया येथेच घोषित करण्यात आला असे नाही, तर परमेश्वरावरील तुमचा विश्वास सर्वत्र जाहीर झाला आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल काही सांगण्याची आम्हाला गरजच राहिली नाही. 9 कारण ते स्वतः अहवाल देतील की आमचे स्वागत तुम्ही कशाप्रकारे केले आणि जे जिवंत व खरे परमेश्वर आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही मूर्तीपासून कसे दूर झाला आहात. 10 आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.