4
 1 धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.   
पुढील सूचना 
  2 जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा.   3 ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे.   4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा.   5 बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.   6 तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल.   
अखेरच्या शुभेच्छा 
  7 तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी*किंवा गुलाम आहे.   8 मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.   9 विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवित आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील.   
 10 माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.   
 11 येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत.   
 12 जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे.   13 मी साक्ष देतो की, त्याने तुमच्यासाठी आणि लावदिकीया व हिरापोलिस येथील लोकांसाठी फार श्रम केले आहेत.   
 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत.   
 15 लावदिकीया येथील विश्वासणार्या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा.   
 16 तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे.   
 17 अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.”   
 18 मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.