7
दावीदाला परमेश्वराचे अभिवचन
राजा आपल्या राजवाड्यात राहत असताना व याहवेहने त्याला त्याच्या चहूकडील सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर, राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!”
नाथानाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या मनात जे काही आहे, त्यानुसार करा, कारण याहवेह तुम्हाबरोबर आहेत.”
परंतु त्याच रात्री याहवेहचे वचन नाथानाकडे आले, ते असे:
“जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय? इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्‍यातूनच फिरत आलो आहे. जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’
“तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले. जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन. 10 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये. 11 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी*परंपरेनुसार न्यायाधीश नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन.
“ ‘याहवेह असे जाहीर करतात, की याहवेह स्वतः तुझ्यासाठी घर स्थापित करतील: 12 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन. 13 तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. 14 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन. 15 परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही. 16 तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
17 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
दावीदाची प्रार्थना
18 नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले:
“हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे? 19 आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे!
20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. 21 आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे.
22 “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही. 23 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहेत—पृथ्वीवरील असे एक राष्ट्र ज्यांनी आपले लोक व्हावे म्हणून परमेश्वर त्यांना खंडून घेण्यास व आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी गेले; आणि ज्या तुमच्या लोकांना तुम्ही इजिप्त देशातून,किंवा त्यांच्या दैवतांपासून म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? 24 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.
25 “तर आता, हे याहवेह परमेश्वरा, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळपर्यंत पूर्ण करावे, आपण म्हटल्याप्रमाणे आपण करावे, 26 यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे.
27 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या सेवकाला हे प्रकट केले आहे की, ‘मी तुझे घर बांधीन.’ त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे ही प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे. 28 सार्वभौम याहवेह, तुम्ही परमेश्वर आहात! तुमचा करार विश्वासयोग्य आहे आणि तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. 29 तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद द्या, म्हणजे त्यांनी तुमच्या दृष्टीपुढे सदैव राहावे; कारण, सार्वभौम याहवेह, तुम्ही हे बोलला आहात आणि आपल्या आशीर्वादाने तुमच्या सेवकाचे घराणे सदैव आशीर्वादित व्हावे.”

*7:11 परंपरेनुसार न्यायाधीश

7:23 किंवा त्यांच्या दैवतांपासून