6
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. “तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”*अनु 5:16
पित्यांनो,किंवा आईवडिलांनो तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्‍या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा. ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा. तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.
परमेश्वराची शस्त्रसामुग्री
10 सर्वात शेवटी प्रभूच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा. 11 परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल. 12 कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे. 13 यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा. 14 म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. 15 परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. 16 या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल. 17 तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.
18 सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा. 19 माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे. 20 त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.
 
शेवटच्या शुभेच्छा
21 येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल. 22 आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे.
 
23 बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो!
 
24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्‍या तुम्हा सर्वांवर कृपा असो.

*6:3 अनु 5:16

6:4 किंवा आईवडिलांनो