पौलाचे फिलिप्पैकरांस पत्र
1
1 ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य,
यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक*किंवा सहकारी हा शब्द अशा ख्रिस्ती व्यक्तीसाठी वापरला जातो जी मंडळीच्या वडील लोकांबरोबर इतर कामे करण्यास नेमली गेली आहे यास:
2 परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
उपकारस्तुती व प्रार्थना
3 जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. 4 आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो 5 कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात. 6 माझी खात्री आहे की ज्या परमेश्वराने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केले आहे, त्यास ते ख्रिस्त येशूंच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेतील.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता. 8 ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे.
9 आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी. 10 कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.
पौलाची बंधने शुभवार्तेची वाढ करतात
12 आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. 13 याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे. 14 आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभूमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने अधिक निर्भयपणे शुभवार्ता जाहीर करत आहेत.
15 हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. 16 दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. 17 पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्त्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात. 18 परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार.
होय, त्यातच मी आनंद करीत राहीन. 19 कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका†किंवा तारण होईल हे मला माहीत आहे. 20 याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. 21 कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे! 22 जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! 23 मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे! 24 परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन. 26 मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल.
शुभवार्तेसाठी योग्य जीवन जगणे
27 पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात‡किंवा एका मनाने स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात, 28 पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल. 29 केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे. 30 पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.