16
मान्ना व लावे
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला. त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली. इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”
मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल. सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.”
मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ”
10 अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले.
11 याहवेह मोशेला म्हणाले, 12 “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
13 त्या संध्याकाळी लावे पक्षी त्यांच्या वस्तीवर येऊन उतरले व त्यामुळे छावणी व सभोवतालची सर्व जमीन झाकली गेली आणि सकाळी छावणी सभोवती दवबिंदूंचा थर जमला होता. 14 जेव्हा दवबिंदू नाहीसे झाले, तेव्हा रानातील भूमीवर हिमकणांएवढे खवल्यांसारखे बारीक तुकडे पसरलेले दिसू लागले. 15 जेव्हा इस्राएली लोकांनी ते पाहिले, ते एकमेकास म्हणू लागले, “हे काय आहे?” कारण ते काय होते ते त्यांना ठाऊक नव्हते.
मोशे त्यांना म्हणाला, “हीच ती भाकर आहे जी याहवेहने तुम्हाला खाण्यासाठी दिली आहे. 16 याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर*म्हणजे दीड कि.ग्रॅ. एवढे घ्यावे.’ ”
17 इस्राएली लोकांनी जसे त्यांना सांगितले होते तसे केले; काहींनी अधिक तर काहींनी थोडे गोळा केले. 18 आणि जेव्हा त्यांनी ते ओमेरच्या मापाने मोजले, ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही. प्रत्येकाने त्यांना जितके लागत होते तितकेच गोळा केले होते.
19 मग मोशे त्यांना म्हणाला, “यातील काहीही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये,”
20 तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.
21 मग रोज सकाळी प्रत्येकाला लागते तेवढेच ते गोळा करीत असत आणि जेव्हा सूर्य प्रखर होई, तेव्हा ते वितळून जात असे. 22 आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला. 23 मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”
24 म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले. 25 मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही. 26 सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”
27 पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही. 28 मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार? 29 हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.” 30 म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
31 इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्नाअर्थात् हे काय आहे? असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती. 32 मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्‍या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”
33 मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्‍या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.”
34 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल. 35 इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला.
36 (एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.)

*16:16 म्हणजे दीड कि.ग्रॅ.

16:31 अर्थात् हे काय आहे?