17
खडकातून पाणी
सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते. तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”
मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”
पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”
मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.”
मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ. होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा*अर्थात् परीक्षा व मरीबाहअर्थात् भांडण असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.
अमालेकांवर विजय
नंतर अमालेकी आले व त्यांनी इस्राएली लोकांवर रफीदीम येथे हल्ला केला. मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.”
10 मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले. 11 जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे. 12 जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. 13 आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.
14 मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”
15 मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सीम्हणजे याहवेह आमचे ध्वज असे ठेवले. 16 तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”

*17:7 अर्थात् परीक्षा

17:7 अर्थात् भांडण

17:15 म्हणजे याहवेह आमचे ध्वज