25
निवासमंडपासाठी द्यावयाची अर्पणे
1 मग याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.
3 “त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत:
“सोने, चांदी आणि कास्य;
4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग,
बोकडाचे केस;
5 लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म;*मूळ भाषेत तहशाची कातडी
बाभळीचे लाकूड;
6 दिव्यासाठी जैतुनाचे तेल;
अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
7 एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
8 “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे. 9 हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.
कराराचा कोश
10 “त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.†म्हणजे 110 सें.मी. लांब, 68 सें.मी. रुंद व उंच 11 त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा. 12 त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला अशा त्या बसवाव्यात. 13 मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे. 14 कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या. 15 या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये. 16 मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.
17 “प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे. 18 मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत. 19 एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे. 20 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी. 21 हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात. 22 तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.
भाकरीचा मेज
23 “बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात‡म्हणजे 90 सें.मी. लांब, 45 सें.मी. रुंद, 68 सें.मी. उंच उंच असावा. 24 त्याला शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे आणि त्याभोवती सोन्याचा काठ करावा. 25 मेजाच्या सभोवती चार बोटे§अंदाजे 7.5 सें.मी. रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा. 26 मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्यांवर लावाव्या. 27 मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ असाव्यात. 28 दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा. 29 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे. 30 त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.
दीपस्तंभ
31 “शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत. 32 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्या बाजूला. 33 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे. 34 आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे. 35 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या. 36 या सर्व कळ्या व फांद्या शुद्ध सोन्याच्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून असाव्या.
37 “मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल. 38 त्यांच्या वातीचे चिमटे व ते ठेवण्याची तबके शुद्ध सोन्याची असावी. 39 दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत*अंदाजे 34 कि.ग्रॅ. शुद्ध सोन्याचा उपयोग करावा. 40 मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे.”