27
होमवेदी 
  1 “बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद*अंदाजे 1.4 मीटर उंच, 2.3 मीटर लांब व रुंद असून ती चौकोनी असावी.   2 तिच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे.   3 वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत.   4 तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या.   5 वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.   6 वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे.   7 दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील.   8 फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.”   
निवासमंडपाचे अंगण 
  9 “निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात†अंदाजे 45 मीटर लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,   10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या.   11 उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.   
 12 “अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात‡अंदाजे 23 मीटर रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.   13 सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.   14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात§अंदाजे 7 मीटर लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.   15 आणि दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.   
 16 “अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात*अंदाजे 9 मीटर लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.   17 अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.   18 अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.   19 निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.”   
दिव्यासाठी तेल 
  20 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.   21 सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”