4
1 आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही. 2 पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते. 3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली*किंवा सामान्य तत्वांच्या दबावाखाली होतो. 4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. 5 जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. 6 कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.” 7 आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.
पौलाची गलातीकरांबद्दलची आस्था
8 तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता. 9 पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता? 10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता! 11 तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.
12 प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही. 13 वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता. 14 माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो. 15 तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते. 16 आता सत्य बोलून मी तुमचा शत्रू झालो काय?
17 ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात. 18 आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे. 19 माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील. 20 आताच मी तिथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे.
हागार व सारा
21 मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का? 22 असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. 23 त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
24 अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे. 25 आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे. 26 परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे. 27 जसे यशायाहने लिहिले आहे:
“हे वांझ स्त्रिये,
तू जी कधीही प्रसवली नाही;
उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर,
कारण विवाहित स्त्रीपेक्षा,
तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही,
त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”†यश 54:1
28 आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत. 29 त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे. 30 पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”‡उत्प 21:10 31 प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.