5
ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य
ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका.
माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.
तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही. “थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.” 10 मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल. 11 बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते. 12 जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे.
आत्म्याने प्रेरित जीवन
13 बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा. 14 कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.”*लेवी 19:18 15 तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
16 मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. 17 दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये. 18 जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
19 देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा, 20 मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट, 21 हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
22 परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, 23 सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे. 25 जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. 26 तर आता आपण गर्विष्ठ होऊ नये व एकमेकांना चीड आणू नये.

*5:14 लेवी 19:18