7
 1 जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो,  
तेव्हा एफ्राईमचे पाप  
आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात.  
ते लबाडी करतात,  
चोर घरात चोरी करतात,  
लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;   
 2 परंतु त्यांना हे कळत नाही  
की त्यांची सर्व वाईट कृत्ये मला स्मरण आहेत.  
त्यांच्या पापकर्मांनी त्यांना घेरले आहे;  
ते नेहमी माझ्यासमोर असतात.   
 3 “ते राजाला आपल्या दुष्टाईने,  
अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात.   
 4 ते सर्वच व्यभिचारी आहेत;  
रोटी भाजणार्याच्या सतत  
पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत.  
पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.   
 5 आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी  
अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात,  
आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्यांबरोबर मिळविला आहे.   
 6 कारस्थाने करताना त्यांची हृदये  
तापलेल्या भट्टीसारखी होतात.  
त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते;  
सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.   
 7 ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत;  
ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात.  
त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत,  
त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.   
 8 “एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो;  
एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.   
 9 परकीय लोक त्याच्या शक्तीचे शोषण करतात,  
पण त्याला हे कळत नाही  
त्याचे केस पांढरे होत चालले आहेत,  
पण तो त्याची नोंद घेत नाही.   
 10 इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात,  
हे सर्व असूनही  
तो याहवेह त्याच्या परमेश्वराकडे वळत नाही,  
किंवा त्यांचा शोध घेत नाही.   
 11 “एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा  
बुद्धिहीन आणि सहज फसणारा आहे—  
तो आता इजिप्तला हाक मारतो;  
आता तो अश्शूराकडे धाव घेतो.   
 12 जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन;  
मी त्यांना आकाशातील पक्ष्याप्रमाणे खाली आणेन.  
जेव्हा मी ऐकेन की ते एकत्र होत आहेत,  
तेव्हा मी त्यांना पकडेन.   
 13 ते माझ्यापासून बहकले आहेत  
म्हणून त्यांचा धिक्कार असो!  
त्यांचा नाश होवो,  
कारण त्यांनी माझ्याविरुद्ध विद्रोह केला आहे.  
मला त्यांचा उद्धार करावयाची इच्छा होती,  
पण ते माझ्याबद्दल खोटे बोलतात.   
 14 ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत,  
परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात.  
ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी  
त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात,*काही मूळ प्रतींनुसार भीक मागत एकत्र येतात  
पण ते माझ्यापासून दूर राहतात.   
 15 मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे,  
परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.   
 16 ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत;  
तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत.  
उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी  
तलवारीला बळी पडतील.  
यामुळे इजिप्त देशात  
त्यांची थट्टा करण्यात येईल.