8
इस्राएल वावटळीची कापणी करतात
1 “तू कर्णे आपल्या मुखाला लाव!
याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे,
कारण लोकांनी माझा करार मोडला आहे
आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे.
2 इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो,
‘आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचा स्वीकार करतो!’
3 इस्राएलने जे उत्तम ते नाकारले आहे;
शत्रू त्याचा पाठलाग करतील.
4 त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत;
ते माझ्या मान्येतेशिवाय अधिपतींना निवडतात.
त्यांनी आपले चांदी आणि सोने घेऊन
स्वतःच्या नाशाकरिता
मूर्ती बनविल्या आहेत.
5 हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे!
त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे.
ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?
6 ते इस्राएलाकडून आहे!
हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे;
तो परमेश्वर नाही.
शोमरोनाच्या या वासराचे
तुकडे तुकडे करण्यात येतील.
7 “ते वारा पेरतात
आणि ते वावटळीची कापणी करतात.
त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत;
त्यातून पीठ तयार होत नाही.
जर त्यातून अन्न तयार झाले
तर परकीय ते गिळून टाकतील.
8 इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे;
राष्ट्रांमध्ये ती कोणासही
आवडत नाही.
9 एकाकी भटकणार्या रानगाढवासारखे ते वर
अश्शूराकडे गेले आहे.
एफ्राईमने स्वतःस तिच्या प्रियकरांना विकले आहे.
10 जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल,
तरीही आता मी त्यांना एकत्र करेन.
बलाढ्य राजाच्या अत्याचाराने
ते नष्ट होऊ लागतील.
11 “एफ्राईमने पापार्पण करण्यास पुष्कळ वेद्या बांधल्या आहेत,
पण ते पाप करण्याच्या वेद्या झाल्या आहेत.
12 मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या,
पण त्यांनी ते परकीय मानले.
13 जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात,
आणि तरीही ते मांस खातात,
याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही.
आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार
आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार:
ते इजिप्तला परततील.
14 कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे
आणि राजवाडे बांधले;
यहूदाहने अनेक तटबंदीची नगरे बांधली आहेत.
पण मी त्यांच्या नगरांवर अग्नी पाठवून
त्यांचे किल्ले भस्म करेन.”