11
इशायापासून फांदी 
  1 इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल;  
त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल.   
 2 याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल—  
शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा,  
सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा,  
ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—   
 3 आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील.  
ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत,  
किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.   
 4 परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील,  
न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील.  
ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील;  
ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.   
 5 धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल  
आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.   
 6 लांडगा कोकऱ्याबरोबर राहील,  
चित्ता बकरीबरोबर झोपेल,  
वासरे आणि सिंह एकत्र राहतील;*किंवा सिंह वासराला चारेल  
आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.   
 7 गाई अस्वलाबरोबर चरतील,  
त्यांची पिल्ले एकत्र झोपतील,  
आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.   
 8 लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल,  
आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.   
 9 माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी  
ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत,  
कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे  
तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.   
 10 त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.   11 त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून†बाबिलोन, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.   
 12 राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील  
आणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील;  
पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून  
यहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील.   
 13 एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल,  
आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल;  
एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही,  
किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही.   
 14 ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील;  
एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील.  
एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील,  
आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.   
 15 याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे  
आखात कोरडे करतील;  
होरपळणाऱ्या वाऱ्याने  
ते फरात नदीवर हात झटकून टाकतील.  
ते त्याचे सात ओढे पाडतील  
जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.   
 16 अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी  
जेव्हा ते इजिप्तमधून आले  
तेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता,  
तसा एक राजमार्ग असेल.