18
कूश*किंवा इथिओपिया विरुद्ध भविष्यवाणी
1 कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा,
जिथून पंखांचा फडफड†किंवा टोळ आवाज येतो त्यास धिक्कार असो.
2 जो समुद्रमार्गाने पाण्यावरून
पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो.
जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो,
धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा,
त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे,
विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र,
ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.
3 अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो,
तुम्ही जे पृथ्वीवर राहता,
जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल,
तेव्हा तुम्हाला तो दिसेल,
आणि जेव्हा तुतारी वाजेल
तेव्हा तुम्ही ती ऐकाल.
4 याहवेह मला असे म्हणतात:
“मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन,
सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे,
दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”
5 कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल
आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात,
ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील,
आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.
6 डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी,
भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल;
संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील,
आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील.
7 त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील
धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून,
ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून,
विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून,
ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.
अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील.