19
इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी
इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी:
पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन
इजिप्तला येत आहेत.
इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात,
आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.
 
“मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन—
भाऊ भावाविरुद्ध लढेल,
शेजारी शेजार्‍याविरुद्ध,
शहर शहराविरुद्ध,
राज्य राज्याविरुद्ध.
इजिप्तच्या लोकांचे हृदय खचून जाईल,
आणि मी त्यांच्या योजना विफल करेन;
मूर्तींबरोबर आणि मृतात्म्यांबरोबर,
माध्यमांशी आणि भूतविद्या करणाऱ्यांशी ते सल्लामसलत करतील.
मी इजिप्तच्या लोकांना
क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन,
आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,”
असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
 
नदीचे पाणी वाळून जाईल,
आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.
कालव्यांना दुर्गंधी येईल;
मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील.
लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,
तसेच नाईल नदीच्या काठावरील,
नदिमुखावरील झाडेसुद्धा,
नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले
प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.
जे नाईल नदीत आकड्या टाकतात,
ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील;
जे पाण्यावर जाळे टाकतात
ते झुरणीस लागतील.
जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील,
विणकर आशा हरवतील.
10 कापडकामाचे कारागीर उदास होतील,
आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.
 
11 सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत;
फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात.
तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता,
“ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे,
प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?”
 
12 आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत?
त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे,
कि सर्वसमर्थ याहवेह यांनी
इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे.
13 सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत,
मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे;
तिच्या लोकांच्या कोनशिलांनी
इजिप्तला भरकटून टाकले आहे.
14 याहवेहनी त्यांच्यामध्ये
भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे;
त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते,
जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.
15 इजिप्त काहीही करू शकत नाही—
मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे.
16 त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील. 17 यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील.
18 त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर*काही मूळ प्रतींमध्ये नाशाचे शहर म्हटले जाईल.
19 त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल. 20 इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील. 21 तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील. 22 याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील.
23 त्या दिवशी इजिप्तपासून अश्शूराकडे जाणारा एक महामार्ग असेल. अश्शूरचे लोक इजिप्तकडे आणि इजिप्तचे लोक अश्शूरला जातील. इजिप्तचे आणि अश्शूरचे लोक एकत्र भक्ती करतील. 24 त्या दिवशी इजिप्त आणि अश्शूरबरोबर इस्राएल हे पृथ्वीवरील तिसरे आशीर्वादित राष्ट्रज्याला लोक आशीर्वाद म्हणून पाहतील असेल. 25 सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!”

*19:18 काही मूळ प्रतींमध्ये नाशाचे शहर

19:24 ज्याला लोक आशीर्वाद म्हणून पाहतील