28
एफ्राईम व यहूदीयाच्या पुढाऱ्यांचा धिक्कार 
  1 त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे,  
त्या फिके पडणार्या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला,  
सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या—  
त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!   
 2 पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे.  
तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा,  
वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस,  
तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.   
 3 तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान,  
पायाखाली तुडविला जाईल.   
 4 ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले,  
त्याचे तेजस्वी सौंदर्य,  
कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल—  
लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात,  
व त्यांना गिळंकृत करतात.   
 5 त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह  
त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी  
एक गौरवशाली मुकुट,  
सुंदर पुष्पचक्र असे होतील.   
 6 जे न्याय करण्यासाठी बसतात  
त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील,  
जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात  
त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.   
 7 आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात  
आणि मद्यापासून झोकांड्या देतात:  
याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात  
आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात.  
आणि मद्यापासून झोकांड्या देतात  
ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात,  
निर्णय देताना ते अडखळतात.   
 8 त्यांच्या भोजनांची सर्व मेजे वांतीने भरली आहेत!  
आणि तिथे घाण नाही अशी एकही जागा नाही.   
 9 “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे?  
त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे?  
त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना,  
नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना?   
 10 कारण हे आहे:  
हे करा, ते करा,  
यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम*कदाचित संदेष्ट्याच्या शब्दांची चेष्टा करताना काढलेले व्यर्थ आवाज;  
थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे.”   
 11 ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने  
परमेश्वर या लोकांशी बोलतील,   
 12 ज्यांना ते असे म्हणाले,  
“हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;”  
आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;”  
परंतु ते ऐकणार नाहीत.   
 13 म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल:  
हे करा, ते करा,  
यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम;  
थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे—  
जेणेकरून ते मागे पडतील;  
ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.   
 14 म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात,  
त्या उपहास करणार्या अधिकार्यांनो, याहवेहचे वचन ऐका:   
 15 तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे,  
अधोलोकाशी आम्ही करार केला आहे.  
जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो,  
तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही,  
कारण आम्ही खोट्या गोष्टींना†किंवा खोटी दैवते आमचे आश्रयस्थान केले आहे  
आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”   
 16 म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात:  
“पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड,  
खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला;  
त्यावर भिस्त ठेवणारा,  
कधीही भीतीने त्रस्त होत नाही.   
 17 मी न्यायाला मापनदोरी  
आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन.  
गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल,  
आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.   
 18 मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल;  
अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही.  
जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते,  
तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.   
 19 जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल;  
रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर,  
ते आरपार झाडत राहील.”  
हा संदेश समजून घेतल्याने  
अत्यंत भीती निर्माण होईल.   
 20 तुमचे अंथरूण फारच आखूड आहे,  
तुमचे पांघरूण अगदी अरुंद आहे.   
 21 त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम,  
आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी,  
जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील,  
जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.   
 22 आता तुमचे थट्टा करणे थांबवा,  
नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील.  
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे,  
संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.   
 23 ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या;  
मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या.   
 24 जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का?  
तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का?   
 25 मग त्याने शेत नांगरून तयार केले,  
तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय?  
तो गव्हाच्या ठिकाणी गहू  
आणि जव सरीने लावत नाही का?  
आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?   
 26 त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात  
आणि त्याला योग्य रीत शिकवितात.   
 27 शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही,  
किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही;  
शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो,  
आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.   
 28 भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते;  
म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत.  
ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात,  
पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत.   
 29 ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते.  
त्यांच्या योजना चमत्कारिक असतात,  
त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.