29
दावीदाच्या नगराचा धिक्कार असो 
  1 अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो  
ते नगर जिथे दावीदाने वास्तव्य केले!  
वर्षा पुढे वर्ष जोडा  
आणि तुमच्या सणांचे चक्र पुढे चालू द्या.   
 2 तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन;  
ती शोक करेल आणि विलाप करेल,  
ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल.   
 3 मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन;  
मी तुमच्या भोवताली उंच बुरुजांचे रिंगण उभे करेन.  
आणि मी तुमच्याविरुद्ध वेढा घालण्याची कामे करेन.   
 4 तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला.  
तुमचे बोलणे धुळीतून पुटपुटत येईल.  
पृथ्वीवरून तुमचा आवाज भुतासारखा येईल;  
धुळीमधून तुमचे बोलणे कुजबुज करेल.   
 5 परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील,  
उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी.  
अचानक, एका क्षणातच,   
 6 सर्वसमर्थ याहवेह येतील  
मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह,  
सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.   
 7 तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी,  
जे तिच्यावर आणि तिच्या गडांवर हल्ला करतील आणि तिला वेढा घालतील,  
ते स्वप्नासारखेच होईल,  
ते रात्रीच्या दृष्टान्तासारखे—   
 8 जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो,  
परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो;  
जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो,  
परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो.  
तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या  
सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल.   
 9 सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा,  
तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा.  
झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे,  
लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.   
 10 याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे:  
त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत;  
त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.   
 11 तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”   12 किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”   
 13 प्रभू असे म्हणतात:  
“हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात,  
पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.  
माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;  
त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.*किंवा त्यांचे शिक्षण केवळ मानवी नियम आहेत.   
 14 म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन.  
चमत्कारानंतर चमत्कार करून;  
ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल,  
बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”   
 15 धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून  
लपविण्यासाठी खूप खोलवर जातात,  
जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात,  
“आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”   
 16 तुम्ही गोष्टी उलटवून टाकता,  
जणू कुंभार हा मातीसारखा असेल!  
ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का,  
“तू माझी रचना केली नाहीस?”  
मडके कुंभाराला म्हणू शकते का,  
“तुला काहीच माहीत नाही?”   
 17 लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का,  
आणि सुपीक भूमी जंगलासारखी होणार नाही का?   
 18 त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्यांना ऐकू येतील  
आणि अंधकार व औदासिन्यतेतून  
अंधाचे नेत्र पाहू लागतील.   
 19 नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील;  
गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.   
 20 निर्दयी नाहीसे होतील,  
आणि उपहास करणारे दिसेनासे होतील,  
वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—   
 21 जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात,  
जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात,  
जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात.   
 22 म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात:  
“येथून पुढे याकोब लज्जित होणार नाही.  
येथून पुढे त्यांचे चेहरे पांढरेफटक पडणार नाहीत.   
 23 जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती,  
माझी हस्तकृती बघतील,  
तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील;  
ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील  
आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.   
 24 मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील;  
आणि कुरकुरणारे शिक्षण ग्रहण करतील.”