54
सीयोनचे भावी वैभव 
  1 “हे वांझ स्त्रिये,  
तू जी कधीही प्रसवली नाही;  
उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर,  
कारण विवाहित स्त्रीपेक्षा,  
तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही,  
त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”  
असे याहवेह म्हणतात.   
 2 “आपले तंबू प्रशस्त कर,  
तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव,  
हात आवरू नको;  
दोरबंद लांब कर,  
खुंट्या मजबूत कर.   
 3 कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील;  
तुझे वंशज इतर राष्ट्रांना हुसकावून लावतील  
आणि त्यांची उजाड झालेली नगरे पुन्हा वसवतील.   
 4 “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही.  
अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही.  
तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील  
आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.   
 5 कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे—  
सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे—  
इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत;  
त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.   
 6 याहवेह तुला माघारी बोलावतील  
जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस—  
केवळ टाकून देण्याकरिता  
जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात.   
 7 “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता,  
पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन.   
 8 क्षणिक रागाच्या भरात  
मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते,  
परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने  
मी तुझ्यावर करुणा करेन,”  
असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.   
 9 “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे,  
मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही,  
अशी मी शपथ वाहिली होती.  
आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही,  
तुला पुन्हा कधीही रागविणार नाही.   
 10 कारण पर्वत हलतील  
व टेकड्या काढून टाकल्या जातील,  
परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही  
वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,”  
असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.   
 11 “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो,  
पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन,  
व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन.   
 12 अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या  
वेशी चकाकणार्या रत्नांच्या  
व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन.   
 13 तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील,  
व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.   
 14 तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल:  
जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील;  
तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही.  
दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल;  
ती तुमच्याजवळ येणार नाही.   
 15 जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल;  
जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील.   
 16 “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या  
व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला  
मीच उत्पन्न केले आहे.  
व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे;   
 17 तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही  
आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल.  
याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे,  
हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,”  
अशी याहवेह घोषणा करतात.