55
तहानलेल्यांना आमंत्रण 
  1 “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो,  
पाण्याजवळ या;  
आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत,  
या, घ्या व खा!  
या, द्राक्षारस अथवा दूध घ्या  
पैसे न देता, विनामूल्य घ्या.   
 2 जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे,  
आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे?  
ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा,  
आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.   
 3 माझे ऐका आणि मजकडे या;  
लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.  
मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन,  
माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.   
 4 पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार,  
एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले.   
 5 निश्चितच ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्रांना बोलवाल,  
आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशी राष्ट्रे तुमच्याकडे पळत येतील,  
कारण याहवेह, तुमचे परमेश्वर,  
इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत,  
त्यांनी तुम्हाला गौरवाने संपन्न केले आहे.”   
 6 याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या.  
ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.   
 7 दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे  
अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे.  
त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील,  
आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.   
 8 “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत,  
माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.”  
असे याहवेह म्हणतात.   
 9 “कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे,  
तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत  
आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत.   
 10 आकाशातून पाऊस व हिम  
ज्याप्रमाणे खाली पडतात  
आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय  
परत जात नाहीत  
आणि तिला अंकुरतात व बहरतात,  
जेणेकरून पेरणार्यासाठी बीज निपजते व खाणार्याला भाकर मिळते,   
 11 त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते:  
ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही,  
पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते  
व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.   
 12 तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल  
व शांतीने मार्गदर्शित व्हाल;  
पर्वते आणि टेकड्या,  
तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील,  
आणि रानातील सर्व वृक्ष  
टाळ्या वाजवतील.   
 13 काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील,  
आणि तिथे रिंगणीच्या जागी मेंदीची झाडे वाढतील.  
हे याहवेहच्या नामाच्या थोरवीकरिता असेल  
जे अनंतकाळपर्यंत टिकेल,  
असे ते सर्वकाळचे चिन्ह होईल.”