7
 1 “या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का?  
त्यांचे दिवस हे मोलकर्यासारखे नाहीत काय?   
 2 जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो,  
किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो,   
 3 त्याचप्रमाणे मला निष्फळतेचे महिने दिले गेलेले आहेत,  
कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.   
 4 मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’  
रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो.   
 5 माझे मांस किड्यांनी व खपल्यांनी आच्छादून गेले आहे;  
माझी त्वचा फाटून चिघळत आहे.   
 6 “माझे दिवस विणकर्याच्या मागापेक्षा वेगवान आहेत,  
आणि ते आशेविनाच संपतात.   
 7 हे परमेश्वरा माझे जीवन मात्र श्वास आहे याची आठवण करा;  
माझे नेत्र पुन्हा कधीही सुख पाहणार नाहीत.   
 8 जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत;  
तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.   
 9 ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात,  
त्याचप्रमाणे जो कबरेत जातो तो कधीही परत येत नाही.   
 10 तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही;  
त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.   
 11 “म्हणून मी शांत राहणार नाही;  
मी आपल्या आत्म्याचा खेद उघड करून सांगेन,  
माझ्या जिवाच्या कडूपणात मी गार्हाणे करेन.   
 12 मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का,  
की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?   
 13 जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल,  
आणि माझा पलंग माझे गार्हाणे हलके करेल,   
 14 तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात  
आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,   
 15 असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा,  
गळा दाबून मरणे मला बरे वाटते.   
 16 मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही.  
मला एकटे असू द्या; माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.   
 17 “मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे,  
व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,   
 18 दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी  
आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?   
 19 माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का,  
एकही क्षण मला एकटे सोडणार नाही का?   
 20 जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते,  
त्या तुमचे मी काय केले?  
माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे?  
मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?   
 21 माझ्या अपराधांची क्षमा करून  
माझ्या पापांची गय का करीत नाही?  
कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे,  
तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.”