9
इय्योब 
  1 मग इय्योबाने उत्तर दिले,   
 2 “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो.  
परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?   
 3 त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले,  
तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.   
 4 त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे.  
त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?   
 5 ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात,  
आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.   
 6 ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात,  
आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.   
 7 ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही;  
ते तार्यांचा प्रकाश मुद्रित करतात.   
 8 तेच एकटे आकाश ताणून पसरवितात  
आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात.   
 9 सप्तर्षी, मृगशीर्ष,  
कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.   
 10 आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये;  
आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात.   
 11 ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही;  
ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.   
 12 जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल?  
‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?   
 13 परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत;  
राहाबाच्या सैन्याची टोळी*राहाब एक काल्पनिक समुद्री राक्षसी प्राणी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते.   
 14 “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार?  
त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?   
 15 मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही;  
मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन.   
 16 मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता;  
तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.   
 17 वादळाने ते मला चेंगरून टाकतात  
आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.   
 18 ते मला श्वास घेऊ देत नाहीत,  
परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.   
 19 जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत!  
आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?   
 20 मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल;  
मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.   
 21 “मी जरी निर्दोष असलो,  
मला स्वतःबद्दल चिंता नाही;  
मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.   
 22 हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो,  
‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’   
 23 जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते,  
निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.   
 24 जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते,  
ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात.  
जर ते नाहीत, तर मग कोण?   
 25 “माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत;  
आनंदाची झलक नसतानाच ते उडून जातात.   
 26 ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे,  
भक्ष्यावर झडप घालणार्या गरुडासारखे निघून जात आहेत.   
 27 मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्हाणे विसरेन,  
माझे भाव बदलून उल्हास करेन,’   
 28 तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील;  
कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.   
 29 मी आधी दोषी ठरविला गेलो आहे,  
तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?   
 30 जरी मी स्वतःला साबणाने,  
आणि माझे हात क्षाराने धुतले,   
 31 तरी देखील तुम्ही मला चिखलाच्या खड्ड्यात टाकाल,  
आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.   
 32 “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे,  
किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू.   
 33 परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता,  
कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता,   
 34 कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा,  
म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही.   
 35 मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन,  
पण या घटकेला, मी ते करू शकत नाही.