16
इय्योबाचे प्रत्युत्तर 
  1 यावर इय्योब म्हणाला:   
 2 “अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत;  
तुम्ही सर्व पोकळ सांत्वनकर्ते आहात!   
 3 तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का?  
तुम्हाला काय त्रास होत आहे की तुम्ही सतत वाद घालावे?   
 4 तुम्ही माझ्या जागी असता,  
तर मी सुध्दा तुमच्यासारखेच बोललो असतो;  
मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते  
आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते.   
 5 परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल;  
तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन.   
 6 “परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही;  
आणि जरी मी गप्प राहिलो तरी ते जात नाही.   
 7 खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे;  
तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे.   
 8 तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत.  
माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते.   
 9 परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात,  
आणि माझ्यावर दात खातात;  
माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत.   
 10 ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात;  
तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात.  
आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात.   
 11 परमेश्वराने मला देवहीनांच्या स्वाधीन केले आहे  
आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.   
 12 मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे.  
माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे.  
त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे;   
 13 त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत.  
दया विरहित ते माझी आतडी*आतडी इब्री भाषेत मूत्रपिंड छेदतात  
आणि माझे पित्त भूमीवर ओततात.   
 14 पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात;  
एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.   
 15 “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे  
आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे.   
 16 रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे,  
आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत.   
 17 तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही  
आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.   
 18 “अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस;  
माझे रुदन कधीही विश्रांती न पावो!   
 19 तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे;  
माझा कैवारी उच्चस्थानी आहे.   
 20 माझा मध्यस्थ माझा मित्र आहे†किंवा माझे मित्र माझा तिरस्कार करतात  
आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात;   
 21 एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी  
तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो.   
 22 “केवळ काही वर्षे निघून जातील  
आणि फिरून परत येत नाही त्या वाटेने मी रवाना होईल.