17
 1 माझा आत्मा तुटून गेला आहे,  
माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे,  
कबर माझी वाट पाहत आहे.   
 2 खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात;  
त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे.   
 3 “हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा.  
कारण मला जामीन आणखी कोण आहे?   
 4 तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे;  
म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही.   
 5 जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात,  
त्यांच्या लेकरांचे डोळे अंध होतील.   
 6 “परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे,  
असा मनुष्य, ज्याच्या तोंडावर लोक थुंकतात.   
 7 दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत;  
आणि माझे शरीर सावलीसारखे झाले आहे.   
 8 यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत;  
निर्दोष लोक देवहीनांवर उठले आहेत.   
 9 तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील,  
आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.   
 10 “परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा!  
तुमच्यात एकही बुद्धिमान मला सापडणार नाही.   
 11 माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत.  
परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही.   
 12 ते रात्रीला दिवसात बदलतात;  
आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात.   
 13 ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे,  
अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल,   
 14 जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले  
आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन,   
 15 तर मग माझी आशा कुठे आहे—  
आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?   
 16 ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का?  
आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?”