20
सोफर 
  1 मग सोफर नामाथीने उत्तर देऊन म्हटले:   
 2 “माझे त्रस्त विचार मला उत्तर देण्यास प्रेरित करीत आहेत  
कारण मी फारच अस्वस्थ झालो आहे.   
 3 मला अपमानित करणार्या धमक्या मला ऐकायला येतात,  
आणि माझी सुबुद्धी उत्तर देण्यास मला प्रवृत्त करीत आहे.   
 4 “पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली,  
तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत,   
 5 की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे,  
देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.   
 6 जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला  
आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले,   
 7 तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार;  
जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’   
 8 तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही.  
रात्रीच्या दृष्टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.   
 9 ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत;  
त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही.   
 10 त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील;  
आणि स्वतःच्या हातांनी आपली संपत्ती परत करतील.   
 11 तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे  
तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.   
 12 “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते  
आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,   
 13 ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते  
म्हणून हळूहळू चघळत राहतो,   
 14 तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही;  
त्याच्या पोटात ते सापाच्या विषासारखे होईल.   
 15 गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार;  
परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.   
 16 तो सापाचे विष चोखून घेईल;  
विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.   
 17 मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्या प्रवाहाने वाहतात,  
त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.   
 18 ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही;  
त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.   
 19 कारण त्याने गोरगरिबांवर जुलूम करून त्यांना निराधार सोडले;  
जी घरे त्याने बांधली नाहीत, ती त्याने जप्त केली.   
 20 “त्याच्या हावेपासून त्याला कधीही सुटका मिळणार नाही;  
त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही.   
 21 गिळून टाकावे असे आता काही उरले नाही;  
त्याची समृद्धी दीर्घकाल टिकणार नाही.   
 22 त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल;  
आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील.   
 23 जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार,  
तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल  
आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल.   
 24 लोखंडी शस्त्रांपासून त्याने जरी पळ काढला,  
तरी कास्य धनुष्यबाण त्याच्या पार जाईल.   
 25 बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल,  
आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल.  
तो भीतीने ग्रस्त होईल.   
 26 निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे,  
अग्नी त्याला भस्म करेल  
आणि त्याच्या तंबूमध्ये जे काही उरलेले आहे ते गिळून टाकेल.   
 27 आकाश त्याचे दोष प्रकट करेल;  
आणि पृथ्वी त्याच्याविरुद्ध उभी राहील.   
 28 त्याचे घर पुराने वाहून जाईल,  
परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्याची सर्व संपत्ती पाण्याच्या ओघात नष्ट होईल.   
 29 दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे,  
परमेश्वराने त्यांच्याकरिता नेमलेला वारसा तो हाच आहे.”