21
इय्योब 
  1 मग इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:   
 2 “माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका;  
आणि हेच तुमच्याकडून माझ्यासाठी सांत्वन असे असू द्या.   
 3 मी बोलत असताना धीर धरा,  
त्यानंतर खुशाल माझी थट्टा करा.   
 4 “माझी तक्रार मनुष्याविरुद्ध आहे काय?  
मी अधीर का असू नये?   
 5 माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा;  
आपल्या मुखावर आपला हात ठेवा.   
 6 याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो;  
भीतीने माझे शरीर थरथर कापते.   
 7 दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते,  
वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?   
 8 त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात,  
आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.   
 9 त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात;  
परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.   
 10 त्यांचा बैल निष्फळ असत नाही;  
त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.   
 11 ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात;  
आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.   
 12 डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात;  
आणि बासरीच्या स्वरावर हर्षनाद करतात.   
 13 ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात  
आणि शांतीने*किंवा अचानक खाली कबरेत जातात.   
 14 तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा!  
तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.   
 15 हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी?  
त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’   
 16 परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही,  
म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो.   
 17 “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो?  
आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते,  
परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?   
 18 ते कितीदा वार्यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात,  
व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?   
 19 असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’  
दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी,  
म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल!   
 20 आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे;  
सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.   
 21 जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो  
तेव्हा आपण आपल्यामागे सोडून दिलेल्या कुटुंबाविषयी त्याला काय चिंता?   
 22 “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल,  
कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?   
 23 एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो,  
जो सुरक्षित आणि सुखी असतो,   
 24 जो शरीराने सुदृढ,  
आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे.   
 25 आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो,  
ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो.   
 26 तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात,  
आणि दोघेही किड्यांनी झाकले जातात.   
 27 “आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे,  
माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.   
 28 तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे,  
ज्यात दुष्टाचा डेरा होता?’   
 29 जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय?  
आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—   
 30 अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो,  
आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?   
 31 उघडपणे त्यांना कोण दोष लावणार?  
त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?   
 32 त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते,  
आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.   
 33 दरीतील माती त्याला गोड लागते;  
असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत,  
आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात.   
 34 “तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल?  
कारण तुमची प्रत्युत्तरे केवळ असत्य आहेत!”