22
एलीफाज
मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:
“मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का?
अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?
जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद?
तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?
 
“तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध
आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का?
तुझी दुष्टता पुष्कळ नाही का?
तुझे अपराध अनंत नाही का?
तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस;
आणि लोकांना वस्त्राशिवाय सोडले.
थकलेल्यांना तू पाणी दिले नाही
आणि तू भुकेल्‍यांपासून अन्न राखून ठेवलेस,
जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास;
सन्माननीय मनुष्य असा त्या भूमीवर राहत होतास
आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले
तसेच अनाथांना बलहीन केलेस.
10 म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे,
अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात,
11 इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही,
आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे.
 
12 “परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय?
आणि अतिउंच असलेल्या त्या तार्‍यांकडे बघ!
13 पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत?
निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय?
14 ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात
तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’
15 पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते
त्यावर अजून किती काळ तू चालशील?
16 ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्‍या आधी उठविले गेले,
त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.
17 ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा!
सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’
18 तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली,
म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो.
19 नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील;
निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील,
20 ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे,
अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’
 
21 “परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर;
म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.
22 त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे
त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.
23 जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील:
तर तू पुनर्स्थापित होशील.
24 जर तू आपले सोने धुळीत मिळवशील,
आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,
25 तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने,
आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.
26 मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्‍ये आनंद पावशील
व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.
27 तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील,
आणि तुझे नवस तू फेडशील.
28 ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल,
आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल.
29 जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’
जे पडलेले ते वाचविले जातील.
30 आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील,
आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.”