29
इय्योबाचे शेवटचे समर्थन 
  1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:   
 2 “माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती,  
त्या दिवसांची मला खूप आस आहे,   
 3 जेव्हा त्यांचा प्रकाशदीप माझ्या मस्तकावर पडत असे  
मग अंधारातही त्यांच्याच प्रकाशात मी चालत असे!   
 4 माझ्या उत्कृष्ट दिवसात,  
जेव्हा माझे घराणे परमेश्वराच्या जिव्हाळ्याच्या संगतीने आशीर्वादित होते,   
 5 जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती  
आणि माझी मुलेबाळे माझ्याभोवती होती,   
 6 जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे  
आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.   
 7 “जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई  
आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे,   
 8 तरुण मला पाहून बाजूला होत असत,  
आणि वृद्ध आदराने उभे राहत;   
 9 अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत  
आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत;   
 10 सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून  
शांतपणे उभे राहत असत.   
 11 ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत,  
आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली.   
 12 कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे,  
त्यांची मी सुटका केली.   
 13 मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे;  
आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.   
 14 नीतिमत्वाला मी पांघरले होते;  
न्याय हाच माझा झगा व मुकुट असे.   
 15 मी अंधाचे नेत्र  
आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.   
 16 मी गरजवंतांचा पिता होतो;  
आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे.   
 17 मी दुष्टांचे जबडे फाडून  
त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले.   
 18 “मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन,  
मातीच्या कणांइतके माझ्या आयुष्याचे दिवस असतील.   
 19 माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील,  
आणि रात्रभर दहिवर माझ्या फांद्यांना भिजवतील.   
 20 माझे वैभव कधीही नष्ट होणार नाही;  
आणि माझे धनुष्य सदैव माझ्या हातात नवेच राहील.’   
 21 “लोक माझे बोलणे उत्सुकतेने ऐकत,  
माझ्या सल्ल्याची शांतीने वाट बघत.   
 22 माझे बोलणे संपल्यावर;  
माझे शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर ते पुन्हा बोलत नसत.   
 23 पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत  
माझे शब्द ते वसंत ऋतुतील पावसासारखे प्राशन करीत.   
 24 मी त्यांच्याकडे हसतमुखाने बघितल्यास ते विश्वास करीत नसत;  
माझे मुखतेज त्यांना मोलाचे वाटे.   
 25 त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले;  
त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला;  
शोक करणार्यांचे सांत्वन करणारा असा मी होतो.