28
मानवाचा ज्ञानासाठी शोध 
  1 चांदीसाठी खाण असते  
आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते.   
 2 लोखंड मातीतून घेतले जाते,  
आणि दगड वितळून तांबे काढले जाते.   
 3 मनुष्य अंधाराची कदर न करता;  
खूप दूर त्या दाट अंधकारात  
त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो.   
 4 मनुष्यांच्या वसतीपासून दूर,  
जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात;  
व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात.   
 5 पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते,  
ती खाली अग्नीने पालटून गेली आहे;   
 6 तिच्या खडकातून नीलमणी येतात,  
आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात.   
 7 कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही,  
कोणत्याही बहिरी ससाण्याची नजर त्यावर पडली नाही.   
 8 गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली,  
ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला.   
 9 गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात  
आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.   
 10 ते खडकामधून भुयारे तयार करतात;  
आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.   
 11 पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात  
आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात.   
 12 परंतु ज्ञान कुठे सापडेल?  
आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?   
 13 मानवाला त्याचे मोल अवगत नाही;  
जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.   
 14 महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”;  
आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.”   
 15 अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही,  
किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही.   
 16 ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी,  
यांनीही त्याचे मोल करता येणार नाही.   
 17 सोने आणि रत्ने किंवा,  
शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही.   
 18 प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको;  
ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे.   
 19 कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही,  
आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही.   
 20 तर मग ज्ञान कुठून येते?  
आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?   
 21 ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे,  
आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे.   
 22 विनाश आणि मृत्यू म्हणतात,  
“की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.”   
 23 परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो  
ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे.   
 24 कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात.  
आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते.   
 25 जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली  
आणि जलांचे माप घेतले,   
 26 जेव्हा त्यांनी पावसाला नियम,  
आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला,   
 27 तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले;  
त्याची पुष्टी करून त्याची पारख केली.   
 28 याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले,  
“प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे,  
वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”