33
 1 “परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक;  
मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे.   
 2 मी बोलायला माझे मुख उघडत आहे;  
माझे शब्द माझ्या जिभेच्या टोकावर आहेत.   
 3 माझे शब्द सरळ हृदयातून येतात;  
माझे ओठ जे मला माहीत आहे तेच खरेपणाने बोलतील.   
 4 परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे;  
आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.   
 5 तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे;  
ऊठ आणि तुझा खटला माझ्यासमोर चालव.   
 6 परमेश्वरासमोर जसा तू, तसा मीही आहे;  
मी सुद्धा मातीचा घडविलेला आहे.   
 7 माझे भय बाळगण्याची तुला गरज नाही,  
किंवा माझा हात तुझ्यावर भारी नसो.   
 8 “तुला असे बोलताना मी ऐकले आहे—  
हेच शब्द मी ऐकले आहेत—   
 9 ‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही;  
मी स्वच्छ आणि दोषविरहीत आहे.   
 10 तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे;  
आणि ते मला त्यांचा शत्रू मानतात.   
 11 ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात;  
आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’   
 12 “परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस,  
कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.   
 13 तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस  
की ते कोणाच्याही शब्दास प्रतिसाद देत नाही?   
 14 कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्या मार्गाने मानवांशी बोलत असतात—  
जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.   
 15 रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये,  
जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते  
त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,   
 16 परमेश्वर त्यांच्या कानात बोलून  
आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,   
 17 म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील  
आणि अहंकारापासून दूर राहतील,   
 18 खड्ड्यात पडण्यापासून  
आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.   
 19 “किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर  
त्यांच्या हाडांमध्ये सततच्या क्लेशाने शासन होते,   
 20 अशासाठी की त्यांच्या शरीराला अन्नाची किळस वाटेल  
आणि त्यांचा जीव मिष्टान्नाचा तिरस्कार करतो.   
 21 त्यांचे मांस दिसेनासे होते,  
आणि त्यांची लपलेली हाडे आता बाहेर लटकलेली दिसतात.   
 22 ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात,  
आणि त्यांचे जीवन मृतांच्या ठिकाणाकडे*किंवा मृतांच्या संदेष्ट्यांच्या ठिकाणाकडे जाऊन ठेपते.   
 23 तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत,  
हजारांमधला कोणी एक मनुष्य निरोप्या असला,  
जो न्यायी जीवन कसे जगावे याविषयी सांगण्यासाठी पाठविलेला असला,   
 24 आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो,  
‘त्यांना मरणाकडे जाण्यापासून वाचवा;  
त्यांच्यासाठी खंडणी मला मिळाली आहे—   
 25 लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो;  
तरुणपणाच्या दिवसांप्रमाणे त्यांची पुनर्रचना होवो’;   
 26 मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल,  
ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील;  
आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.   
 27 मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील,  
‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले,  
परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.   
 28 परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले,  
आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’   
 29 “परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात;  
दोनदा किंवा तीनदाही ते करीत असतात—   
 30 त्याचा जीव त्या गर्तेपासून फिरवितात,  
यासाठी की जीवनाचा प्रकाश त्याच्यावर उज्वल व्हावा.   
 31 “हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक;  
तू शांत राहा आणि मी बोलेन.   
 32 जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे;  
बोल, कारण तुझे समर्थन मी करावे असे मला वाटते.   
 33 परंतु जर नाही तर माझे ऐक;  
तू शांत राहा आणि मी तुला ज्ञान शिकवेन.”