34
 1 मग एलीहू पुढे म्हणाला:   
 2 “सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका;  
विद्वानांनो, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका.   
 3 कारण कानाला शब्दाची पारख आहे  
जशी जिभेला अन्नाची चव आहे.   
 4 आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या;  
आणि जे उत्तम ते एकत्र शिकू या.   
 5 “इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे,  
परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.   
 6 मी जरी अचूक आहे,  
तरी मला लबाड ठरविले जाते;  
मी जरी दोष विरहित आहे,  
भरणार नाही अशा जखमांनी त्यांचे बाण मला घायाळ करतात.’   
 7 इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय,  
जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?   
 8 तो दुष्टांची सोबत धरतो;  
तो दुष्कर्म करणार्यांशी संबंध ठेवतो.   
 9 कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात  
काही लाभ नाही.’   
 10 “तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका.  
वाईट करणे हे परमेश्वरापासून  
आणि अयोग्य करावे असे सर्वसमर्थापासून दूरच असो.   
 11 ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात;  
आणि त्यांच्या वर्तनास अनुरूप असे फळ त्यांना देतात.   
 12 परमेश्वर चूक करतील,  
किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे.   
 13 त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले?  
किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला?   
 14 जर त्यांच्या मनास आले  
आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,   
 15 तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल  
आणि मनुष्यप्राणी परत धुळीला जाऊन मिळेल.   
 16 “तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका;  
मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका.   
 17 जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय?  
जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?   
 18 ‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे,  
आणि ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे सज्जनांना म्हणणारे परमेश्वरच नाही काय?   
 19 जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही  
आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही,  
कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?   
 20 मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो;  
लोक डळमळतात आणि नाहीसे होतात;  
मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात.   
 21 “मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत;  
परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.   
 22 कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे,  
जिथे दुष्कर्मी लपू शकतील.   
 23 लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही,  
जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.   
 24 चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात  
आणि त्यांच्या स्थानी दुसर्यास स्थापितात.   
 25 कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात,  
रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.   
 26 आणि सर्व लोक पाहू शकतील  
अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,   
 27 कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत  
आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.   
 28 त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत  
अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.   
 29 परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल?  
जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल?  
तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,   
 30 अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून  
आणि लोकांसाठी जाळे टाकण्यापासून प्रतिबंध करता यावा.   
 31 “समजा कोणी परमेश्वराला म्हटले,  
‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.   
 32 मी पाहू शकत नाही ते मला शिकवा;  
मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’   
 33 जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता  
तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय?  
मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे;  
म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा.   
 34 “बुद्धिमान मनुष्य जाहीर करतात,  
ज्ञानी लोक जे माझे बोलणे ऐकतात ते म्हणतात,   
 35 ‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे;  
त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’   
 36 त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी  
कारण तो दुष्टांप्रमाणे बोलत आहे!   
 37 कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो;  
आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो  
आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”