40
 1 याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,   
 2 “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का?  
जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”   
 3 तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:   
 4 “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार?  
मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.   
 5 मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही;  
दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”   
 6 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:   
 7 “पुरुषासारखी आपली कंबर कस;  
मी तुला प्रश्न विचारतो,  
आणि तू मला त्याचे उत्तर देशील.   
 8 “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय?  
स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय?   
 9 तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय,  
तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?   
 10 मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर,  
आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर.   
 11 तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे,  
आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव,   
 12 जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर.  
दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.   
 13 त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक;  
कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक.   
 14 मग मी स्वतः हे मान्य करेन  
की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.   
 15 “बेहेमोथ*बेहेमोथ किंवा पाणगेंड्यासारखा प्रचंड प्राणी कडे पाहा,  
तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले.  
तो बैलाप्रमाणे गवत खातो.   
 16 त्याच्या कमरेत किती शक्ती आहे,  
आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत!   
 17 गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते.  
त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.   
 18 त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत;  
त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत.   
 19 परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे,  
तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो.   
 20 डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात;  
आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात.   
 21 कमलिनीखाली तो पडून राहतो,  
लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.   
 22 कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात;  
ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात.   
 23 उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही;  
यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो.   
 24 उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय,  
किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय?