41
“लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय
किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय?
त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय
किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय?
दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय?
तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय?
जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे
म्हणून तो तुझ्याशी करार करेल का?
एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय
किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील?
विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय?
व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?
त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय
किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय?
जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला,
तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही!
त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे;
तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे.
10 त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही.
तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील?
11 मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे?
आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे.
 
12 “लिव्याथानाचे अवयव,
त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही.
13 त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार?
त्याच्या दुहेरी चिलखतामधून कोण भेद करू शकेल?
14 जी भयानक दातांनी घेरलेली आहे,
अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे?
15 त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत
ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत;
16 ती एकमेकांना इतकी जखडून आहेत
की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही.
17 ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत;
ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत.
18 त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात;
त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत.
19 त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात;
अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात.
20 जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा
तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो.
21 त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो,
आणि त्याच्या मुखातून तापलेल्या ज्वाला पडतात.
22 त्याच्या मानेत सामर्थ्य राहते;
त्याच्यापुढे भीती चालत असते.
23 त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत;
ते दृढ आणि अढळ असतात.
24 त्याची छाती खडकासारखी कडक आहे,
जात्याच्या तळीसारखी कणखर आहे.
25 तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात;
त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात.
26 त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा,
अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही.
27 लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे
आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो.
28 बाण त्याला पळवून लावू शकत नाही;
आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत.
29 लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते;
भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो.
30 त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखा आहे,
मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो.
31 तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो
आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो.
32 तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो;
की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत.
33 त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही;
तो एक निर्भय प्राणी आहे.
34 तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो;
जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.”