27
याहवेहचे जे आहे ते सोडविणे
1 याहवेह मोशेला म्हणाले, 2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे. 3 वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल*अंदाजे 575 ग्रॅ. असावे, 4 स्त्रीसाठी तिचे मूल्य चांदीचे तीस शेकेल†अंदाजे 345 ग्रॅ. असावे; 5 पाच ते वीस वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी, पुरुषाचे मूल्य वीस शेकेल‡अंदाजे 230 ग्रॅ. असावे आणि स्त्रीसाठी दहा शेकेल§अंदाजे 115 ग्रॅ. असावे; 6 एक महिना ते पाच वर्षे वयाच्या पुरुषाला चांदीचे पाच शेकेल*अंदाजे 58 ग्रॅ. आणि स्त्रीसाठी चांदीचे तीन शेकेल†अंदाजे 35 ग्रॅ. असावे; 7 साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल‡अंदाजे 175 ग्रॅ. असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे. 8 फारच गरिबीमुळे नवस फेडण्यासाठी मनुष्याला इतके शेकेल भरणे शक्य नसेल, तर ज्याचे समर्पण होत आहे त्याला याजकापुढे उभे करावे. मग नवस फेडण्यासाठी याजक ठरवेल तितके शेकेल त्याने द्यावे.
9 “ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल. 10 त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील. 11 जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे. 12 तो त्याचा दर्जा चांगला किंवा वाईट हे ठरवेल. मग याजक त्याचे जे काही मूल्य ठरवेल, तेवढेच त्याचे मूल्य असेल. 13 परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा.
14-15 “ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल.
16 “ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर§अंदाजे 135 कि.ग्रॅ. जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील. 17 जर योबेल वर्षापासून त्याने आपले शेत समर्पित केले तर त्याची ठरविलेली किंमत तितकीच राहील. 18 तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे. 19 जर शेत समर्पित करणार्याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल. 20 तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही. 21 जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल.
22 “ ‘एखाद्याने स्वतःचे वतन नसलेले, पण दुसर्याकडून विकत घेतलेले शेत याहवेहला समर्पित केले, जी त्याच्या कुटुंबाची संपत्ती नसेल, 23 तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे. 24 योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे. 25 तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा.
26 “ ‘तथापि, कोणीही प्राण्याचे प्रथम जन्मलेले समर्पित करू शकत नाही, कारण प्रथम जन्मलेले मुळातच याहवेहचे आहेत; बैल*नर वा मादी असो वा मेंढरे, ते याहवेहचेच आहे. 27 जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल.
28 “ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.
29 “ ‘मरणदंडाची शिक्षा झालेल्या मनुष्याला खंडणी भरून सोडविता येणार नाही. त्याचा अवश्य वध करावा.
30 “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत. 31 ज्या कोणाला त्यांचा कोणताही दशांश भाग सोडावयाचा असेल त्यांनी त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा भाग अधिक रक्कम भरावी. 32 गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल. 33 कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ”
34 या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.