गणनेचे पुस्तक
1
जनगणना
1 इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले: 2 “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा. 3 तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी. 4 प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.
5 “तुम्हाला मदत करणार्या पुरुषांची नावे ही आहेत:
“रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
6 शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
7 यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
8 इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
9 जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
10 योसेफाचे पुत्र:
एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा;
मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
11 बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
12 दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
13 आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
14 गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
15 नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
16 हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.
17 मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले, 18 आणि दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली. 19 याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:
20 इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 21 रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.
22 शिमओनाच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली. 23 शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.
24 गादच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 25 गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.
26 यहूदाहच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 27 यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.
28 इस्साखारच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 29 इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.
30 जबुलूनच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 31 जबुलून गोत्रांची संख्या 57,400.
32 योसेफाच्या पुत्रांमधून:
एफ्राईमच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 33 एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.
34 मनश्शेहच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 35 मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.
36 बिन्यामीनच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 37 बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती.
38 दानच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 39 दान गोत्रांची संख्या 62,700 होती.
40 आशेरच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 41 आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.
42 नफतालीच्या वंशजातून:
वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली. 43 नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.
44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्यांनी मोजलेले पुरुष ते हेच. 45 सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली. 46 एकूण संख्या 6,03,550 होती.
47 परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही. 48 याहवेहने मोशेला सांगितले होते: 49 “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये. 50 परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा. 51 ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे. 52 इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे. 53 परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”
54 याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.