26
येशूंविरुद्ध कट 
  1 आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,   2 “जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण*वल्हांडण इजिप्त देशातील 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवस खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत. आणि बेखमीर भाकरीच्या सणाला दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिला जाईल.”   
 3 नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.   4 आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते.   5 पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”   
येशूंना बेथानी येथे तैलाभ्यंग 
  6 येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.   7 तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.   
 8 जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?   9 हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”   
 10 हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.   11 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील,†अनु 15:11 परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.   12 माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे.   13 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे ही शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”   
यहूदाह येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास तयार होतो 
  14 यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला.   15 आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली.   16 त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.   
शेवटचे भोजन 
  17 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी?”   
 18 येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ”   19 येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.   
 20 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते.   21 आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”   
 22 येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”   
 23 येशूंनी उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच माझा विश्वासघात करणार आहे.   24 कारण त्यांच्याबद्दल लिहिल्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”   
 25 मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?”  
त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”   
 26 भोजन करीत असताना, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”   
 27 त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या;   28 हे माझ्या कराराचे रक्त‡काही मूळ प्रतींमध्ये नवा करार आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे.   29 मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”   
 30 मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.   
पेत्र येशूंना नाकारतो याविषयीचे येशूंचे भविष्य 
  31 मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे:  
“ ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन,  
आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’§जख 13:7   
 32 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”   
 33 यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”   
 34 येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”   
 35 परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले.   
गेथशेमाने 
  36 मग येशू आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले आणि येशू त्यांना म्हणाले, “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा.”   37 मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहानला बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले.   38 ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”   
 39 मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”   
 40 यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का?   41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”   
 42 येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला मी प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”   
 43 नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते.   44 म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.   
 45 नंतर ते शिष्यांकडे परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पाहा, वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.   46 उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”   
येशूंना अटक 
  47 येशू बोलत आहेत तोच, त्यांच्या बारा पैकी एक, यहूदाह तिथे पोहोचला. त्याच्याबरोबर महायाजक आणि वडीलजनांनी पाठविलेला मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला होता.   48 आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.”   49 तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.   
 50 येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.”*किंवा “माझ्या मित्रा तू का आला आहेस?”  
मग त्या पुरुषांनी पुढे येऊन येशूंना धरले आणि अटक केले.   51 तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते, त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला.   
 52 तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील.   53 मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय?   54 पण मी तशी विनंती केली तर जे काही घडत आहे, त्याविषयाचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?”   
 55 त्यावेळी येशू जमावाला म्हणाले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात बसून शिकवीत असे, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही.   56 यासाठी की संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राप्रमाणे होण्यासाठीच हे सर्व घडत आहे.” मग सर्व शिष्य त्यांना एकट्याला सोडून पळून गेले.   
सन्हेद्रीन सभेपुढे येशू 
  57 येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते.   58 परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.   
 59 मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते.   60 परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही.  
शेवटी दोन माणसे पुढे आली,   61 “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”   
 62 हे ऐकून महायाजक उभा राहिला आणि त्याने येशूंना म्हटले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?”   63 पण येशू शांत राहिले.  
नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”   
 64 येशूंनी उत्तर दिले, “असे तुम्ही म्हणता, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून†स्तोत्र 110:1; दानी 7:13 मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”   
 65 येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “याने ईश्वरनिंदा केली आहे! आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे.   66 तुम्हाला काय वाटते?”  
“तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले.   
 67 मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपराका मारल्या,   68 आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?”   
पेत्र येशूंना नाकारतो 
  69 हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”   
 70 परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”   
 71 मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”   
 72 या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”   
 73 थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”   
 74 हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”  
तेवढ्यात कोंबडा आरवला.   75 त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.   
*26:2 वल्हांडण इजिप्त देशातील 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवस खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत.
†26:11 अनु 15:11
‡26:28 काही मूळ प्रतींमध्ये नवा करार
§26:31 जख 13:7
*26:50 किंवा “माझ्या मित्रा तू का आला आहेस?”
†26:64 स्तोत्र 110:1; दानी 7:13