27
यहूदाह गळफास घेतो
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली. “मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.”
“त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले.
यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला.
महायाजकांनी ते पैसे गोळा केले आणि ते म्हणाले, “हे पैसे आपल्याला मंदिराच्या खजिन्यात भरता येणार नाहीत, हे नियमाविरुद्ध आहे. कारण हे रक्ताचे पैसे आहेत.” म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले, 10 आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”*जख 11:12, 13; यिर्म 19:1‑13; 32:6‑9
पिलातापुढे येशू
11 येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.”
12 महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले. 13 “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले, 14 परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती.
15 आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती. 16 या वर्षी येशू बरब्बासबर्‍याच प्रतींमध्ये येशू आढळत नाही; 17 वचनही पाहा नावाचा एक प्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगात होता. 17 त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?” 18 कारण पिलाताला कळले होते की, लोकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले होते.
19 त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”
20 परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले.
21 राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?”
जमावाने उत्तर दिले, “बरब्बाला सोडावे!”
22 “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले.
“त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले.
23 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?”
पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
24 पिलाताला समजले की आपण काहीही करू शकत नाही, दंगल वाढत आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि सर्व जमावापुढे आपले हात धुतले. “मी या माणसाच्या रक्ताबाबत निर्दोष आहे.” तो म्हणाला, “ही तुमची जबाबदारी आहे.”
25 यावर सर्व जमाव ओरडला, “त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”
26 तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले.
सैनिक येशूंचा उपहास करतात
27 मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले 28 तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला. 29 मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” 30 ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले. 31 येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.
येशूंना क्रूसावर खिळणे
32 ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. 33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”. 34 त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही. 35 येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. 36 मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले. 37 त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते:
हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.
38 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. 39 जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत 40 म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.” 41 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली. 42 ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. 43 तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ” 44 त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.
येशूंचा मृत्यू
45 त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला. 46 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एली, एली,काही मूळ प्रतींमध्ये एलोई, एलोईलमा सबकतनी,” म्हणजे, “माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”§स्तोत्र 22:1
47 तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.”
48 लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला, 49 इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!”
50 मग येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला.
51 त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले 52 आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली. 53 येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.
54 जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!”
55 अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या. 56 त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ*योसेफ मूळ (ग्रीक) भाषेत योसेस यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती.
येशूंना कबरेत ठेवतात
57 संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य, 58 पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. 59 योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले, 60 आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला. 61 मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.
येशूंच्या कबरेवर पहारेकरी
62 सणाच्या तयारीच्या दुसर्‍या दिवशी, वल्हांडण सणाचा पहिला दिवस संपताना, प्रमुख याजकवर्ग आणि परूशी लोक पिलाताकडे गेले. 63 “महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’ 64 यास्तव त्याची कबर तीन दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा हुकूम आपण द्यावा. नाही तर त्याचे शिष्य येऊन शरीर चोरून नेतील आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे, असे लोकांना सांगतील. असे झाले तर ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
65 पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.” 66 याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले.

*27:10 जख 11:12, 13; यिर्म 19:1‑13; 32:6‑9

27:16 बर्‍याच प्रतींमध्ये येशू आढळत नाही; 17 वचनही पाहा

27:46 काही मूळ प्रतींमध्ये एलोई, एलोई

§27:46 स्तोत्र 22:1

*27:56 योसेफ मूळ (ग्रीक) भाषेत योसेस