21
अरादचा नाश
1 इस्राएली लोक अथारीमच्या वाटेने येत आहेत असे नेगेवमध्ये राहत असलेला कनानी राजा अरादने जेव्हा ऐकले, तेव्हा त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला व काहींना कैद केले. 2 तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.” 3 याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह*अर्थात् नाश असे पडले.
कास्याचा सर्प
4 नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले; 5 ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”
6 तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले. 7 लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.
8 तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.” 9 तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.
मोआबाकडे प्रवास
10 इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला. 11 नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला. 12 तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्यात तळ दिला. 13 नंतर तिथून निघून, अमोर्यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे. 14 यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे:
“…सूफाहतील वाहेब†काही मूळ प्रतींमध्ये ज़ाहाब
व आर्णोनाचे ओहोळ 15 आणि ओहोळांचा जो ओघ
आर येथील वस्तीकडे वाहतो
आणि मोआब प्रदेशालगत आहे.”
16 तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”
17 मग इस्राएलने हे गीत गाईले:
“हे विहिरी, उफाळून ये!
त्याविषयी गा,
18 जी विहीर राजपुत्रांनी खोदली,
की ज्यामध्ये लोकांचे सरदार—
आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.”
मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले, 19 मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास, 20 आणि बामोथपासून मोआबामधील खोर्यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.
सीहोन व ओगचा पराजय
21 इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:
22 “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”
23 परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला. 24 परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती. 25 याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली. 26 हेशबोन हे अमोर्यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.
27 म्हणूनच कवी म्हणतात:
“हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या;
सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.
28 “हेशबोनमधून अग्नी निघाला,
सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली.
त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील
नागरिकांना भस्म केले आहे.
29 हे मोआबा, तुझा धिक्कार असो!
कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात!
त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले
व अमोर्यांचा राजा सीहोनच्या हाती
आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.
30 “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे;
दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे.
मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत,
आम्ही त्यांचा नाश केला आहे.”
31 याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले.
32 मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. 33 नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.
34 याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”
35 तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.