22
बालाक बलामाला बोलावितो 
  1 नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे.   
 2 इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले.   3 इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला.   
 4 मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.”  
तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,   5 त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात*फरात ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला:  
“इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत.   6 तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”   
 7 मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.   
 8 बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.   
 9 परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”   
 10 बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:   11 ‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”   
 12 परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”   
 13 सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.”   
 14 तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.”   
 15 नंतर बालाकाने दुसरे सरदार पाठवले, जे पहिल्यापेक्षा अधिक व आणखी प्रतिष्ठित होते.   16 ते बलामाकडे आले आणि म्हणाले:  
सिप्पोरचा पुत्र बालाक असे म्हणतो: “माझ्याकडे येण्यासाठी तुला कोणतीही अडचण असू नये,   17 कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.”   
 18 परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.   19 तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.”   
 20 त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”   
बलामाची गाढवी 
  21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला.   22 परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते.   23 जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले.   
 24 नंतर याहवेहचा दूत द्राक्षमळ्यांच्या मधील अरुंद वाटेवर उभा राहिला, त्याच्या दोन्ही बाजूंना भिंती होत्या.   25 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.   
 26 नंतर याहवेहचा दूत पुढे जाऊन जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.   27 जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले.   28 तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”   
 29 बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.”   
 30 गाढवीने बलामाला म्हटले, “मी तुझी ती गाढवी नाही काय जिच्यावर तू आजपर्यंत बसत आलास? मी तुझ्याशी कधी अशी वागणूक केली काय?”  
तो म्हणाला, “नाही.”   
 31 तेव्हा याहवेहने बलामाचे डोळे उघडले आणि त्याने रस्त्यावर तलवार उपसून उभे असलेल्या याहवेहच्या दूताला पाहिले आणि तो नमन करून पालथा पडला.   
 32 याहवेहच्या दूताने बलामाला विचारले, “तू तुझ्या गाढवीला असे तीन वेळा का मारलेस? मी तुला अडविण्यास आलो कारण माझ्यासमोर तुझा मार्ग विपरीत आहे.   33 गाढवीने मला पाहिले व तीन वेळा माझ्यापासून ती वळली. ती जर वळली नसती, तर आतापर्यंत मी तुला जिवे मारले असते, परंतु त्या गाढवीला वाचविले असते.”   
 34 बलाम याहवेहच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. मला अडवावे म्हणून तुम्ही वाटेत उभे आहात हे मला समजले नाही. मग आता जर हे तुम्हाला आवडले नाही, तर मी माघारी जाईन.”   
 35 याहवेहच्या दूताने बलामाला म्हटले, “त्या पुरुषांबरोबर जा, परंतु जे मी तुला सांगेन तेच तू बोलावे.” म्हणून बलाम बालाकाच्या त्या सरदारांबरोबर गेला.   
 36 बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला.   37 बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?”   
 38 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.”   
 39 मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.   40 तिथे बालाकाने गुरे व मेंढरे यांचे यज्ञ केले आणि त्यातील काही बलाम व जे सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना दिले.   41 सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता.