23
बलामाचा पहिला संदेश 
  1 बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”   2 बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्हा व मेंढा यांचे अर्पण केले.   
 3 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.   
 4 परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.”   
 5 तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”   
 6 म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले.   7 तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला:  
“बालाकाने मला अरामाहून आणले,  
मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले.  
तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे;  
ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’   
 8 ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही,  
त्यांना मी शाप कसा देऊ?  
ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही;  
त्यांचा तिरस्कार मी कसा करू?   
 9 खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो,  
उंच ठिकाणावरून मला ते दिसतात.  
वेगळे राहत असलेले लोक मी पाहतो  
राष्ट्रांबरोबर ते स्वतःला गणत नाहीत.   
 10 याकोबाची धूळ कोण मोजू शकेल,  
किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार?  
मला नीतिमानाचे मरण मरू दे,  
आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!”   
 11 बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”   
 12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”   
बलामचा दुसरा संदेश 
  13 तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.”   14 त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्हा व एक मेंढा अर्पण केला.   
 15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.”   
 16 याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.”   
 17 जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?”   
 18 नंतर त्याने हा संदेश सांगितला:  
“बालाका, ऊठ आणि ऐक;  
सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.   
 19 परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी,  
ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे.  
याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय?  
त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?   
 20 आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे;  
याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही.   
 21 “याकोबात विपत्ती सापडली नाही,  
इस्राएलात क्लेश दिसत नाहीत.  
त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत;  
राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे.   
 22 परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले.  
रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.   
 23 याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही,  
इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही.  
याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल,  
परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!   
 24 लोक सिंहिणीप्रमाणे उठतात;  
ते सिंहासारखे उभे राहतात  
जे त्याची शिकार खाईपर्यंत  
व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”   
 25 मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”   
 26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”   
बलामाचा तिसरा संदेश 
  27 नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”   28 आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.   
 29 बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”   30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्हा व मेंढा अर्पण केला.