24
 1 आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.   2 जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला   3 आणि त्याने आपला संदेश सांगितला:  
“बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी,  
ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,   
 4 जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी,  
जो सर्वसमर्थाकडून दृष्टान्त पाहतो,  
जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:   
 5 “हे याकोबा, तुझे तंबू,  
हे इस्राएला, तुझी राहण्याची ठिकाणे किती सुंदर आहेत!   
 6 “ते खोर्याप्रमाणे पसरतात,  
नदीकिनारी असलेल्या बागेप्रमाणे,  
याहवेहने रोपलेल्या जटामांसीसारखे,  
पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.   
 7 त्यांच्या पोहर्यातून पाणी वाहेल;  
त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल.  
“त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल;  
त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.   
 8 “परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले;  
रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.  
त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात  
आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात;  
ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.   
 9 सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात,  
सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार?  
“जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील  
आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”   
 10 तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास.   11 आता येथून चालता हो! आणि आपल्या घरी जा. मी तुझा मोठा सन्मान करेन असे मी म्हटले होते, परंतु याहवेहने तुला सन्मानापासून वंचित केले आहे.”   
 12 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “तू ज्या दूतांना माझ्याकडे पाठवले त्यांना मी सांगितले नव्हते काय,   13 ‘बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही मला वाटेल ते मी करू शकत नाही, याहवेहच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही; आणि याहवेह सांगतील तेच मी बोलणार’?   14 आता मी माझ्या लोकांकडे परत जात आहे, पण ये, हे इस्राएली लोक येणार्या दिवसात तुझ्या लोकांचे काय करणार त्याविषयी मी तुला चेतावणी देतो.”   
बलामाचा चौथा संदेश 
  15 मग त्याने हा संदेश दिला:  
“बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी,  
ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,   
 16 जो परमेश्वराचे शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी,  
ज्याला परात्पराचे ज्ञान आहे,  
ज्याला सर्वसमर्थाकडून दर्शन घडते,  
जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:   
 17 “मी त्याला पाहतो, पण आता नाही;  
मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही.  
याकोबातून एक तारा उदयास येईल;  
इस्राएलातून एक राजदंड निघेल.  
तो मोआबाचे डोके व  
शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.   
 18 एदोम जिंकला जाईल;  
इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल,  
पण इस्राएल बलवान होईल.   
 19 याकोबातून एक अधिकारी येईल  
आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.”   
बलामाचा पाचवा संदेश 
  20 नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला:  
“अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते,  
परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.”   
बलामाचा सहावा संदेश 
  21 यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला:  
“तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे,  
तुझे घरटे खडकात स्थिर आहे;   
 22 तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील  
तेव्हा तुझा नाश होईल.”   
बलामाचा सातवा संदेश 
  23 त्यानंतर त्याने हा संदेश दिला:  
“हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल?   
 24 कित्तीमाच्या किनार्यावरून जहाजे येतील;  
ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील,  
परंतु त्यांचाही नाश होईल.”   
 25 त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला.