18
1 मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो
आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो.
2 मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत;
परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात.
3 जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो,
आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते.
4 तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत;
परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे.
5 न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे
आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे.
6 मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात;
आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते.
7 मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते,
आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात.
8 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात;
अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
9 जो त्याचे काम करण्यात आळशी आहे,
तो विध्वंस करणार्याचा भाऊ आहे.
10 याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे;
नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.
11 धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे;
ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत.
12 मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते,
परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
13 ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे—
ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.
14 मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो,
पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?
15 विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते.
सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.
16 उपहार तो देणार्याचा मार्ग मोकळा करते,
तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!
17 दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही,
तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्याची बाजू योग्य वाटते.
18 नाणेफेक करून भांडण मिटवता येते,
आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते.
19 चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे.
वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे.
20 त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते;
त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते.
21 जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे.
आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
22 ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे.
ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
23 गरीब दयेसाठी विनवण्या करतो
आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो.
24 ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो,
पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.