21
याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे,
जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.
 
माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत,
परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
 
अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व
रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
 
गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण—
दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात.
 
कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात,
पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.
 
लबाड बोलून मिळवलेली संपत्ती,
म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे.
 
दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल,
कारण चांगले करण्यास ते नकार देतात.
 
दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे,
परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते.
 
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा
छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.
 
10 दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात;
आणि त्यांच्या शेजार्‍यांवर ते कधीही दया करीत नाहीत.
 
11 जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो;
शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात.
 
12 नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात
आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात.
 
13 जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात,
ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.
 
14 गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते;
झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते.
 
15 जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो.
पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते.
 
16 शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य
मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो.
 
17 भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो;
मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.
 
18 दुष्ट नीतिमानांसाठी,
आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो.
 
19 भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा
वाळवंटात राहिलेले बरे!
 
20 शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो,
पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो.
 
21 जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो,
त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो.
 
22 सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो
आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो.
 
23 जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात,
ते संकटापासून दूर राहतात.
 
24 गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव
“टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो.
 
25 आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल,
कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
26 अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो,
परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात.
 
27 दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे—
तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल!
 
28 खोटा साक्षीदार नाश पावेल,
परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल.
 
29 दुष्ट निर्भयतेचा आव आणतो,
पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो.
 
30 मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना
याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.
 
31 लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे,
परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.