22
चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा
व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
 
श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे;
त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.
 
सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
 
याहवेहचे भय ही नम्रता आहे;
त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
 
दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात;
परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.
 
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
 
जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो,
तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.
 
जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल,
आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.
 
उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात,
कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
 
10 टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल;
भांडण आणि अपमान देखील बंद होतील.
 
11 जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो
तो राजाचा मित्र होईल.
 
12 याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात,
परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.
 
13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे!
तो मला भर चौकात ठार करेल!”
 
14 वेश्येचे मुख खोल खड्डा आहे;
ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
 
15 बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,
परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
 
16 श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो
आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.
ज्ञानाची तीस नीतिसूत्रे
प्रथम सूत्र
17 लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव;
मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर,
18 जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील
आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल.
19 म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील,
मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा.
20 सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी
मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?
21 प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय
म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस
त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील?
दुसरे सूत्र
22 गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका,
आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,
23 कारण याहवेह त्यांचा खटला लढतील
आणि जीवनासाठी जीवन घेतील.
तिसरे सूत्र
24 तापट माणसांची मैत्री करू नका,
जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,
25 नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल,
आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.
चौथे सूत्र
26 वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका
किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर
ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.
पाचवे सूत्र
28 ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत
त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.
सहावे सूत्र
29 आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का?
ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही
तर राजांसमोर सेवा करतील.