स्तोत्र 6
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ*शीर्षक: संगीतातील एक शब्द वर आधारित दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह, रागाने माझा निषेध करू नका,
तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.
2 मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे;
मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
3 माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे.
याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?
4 याहवेह, परत येऊन मला सोडवा;
तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
5 मृतलोकात तुमचे स्मरण नाही;
गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?
6 माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे.
रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो.
माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.
7 दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत;
माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.
8 दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा,
कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.
9 याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे;
याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.
10 माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील;
ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.