स्तोत्र 7
बिन्यामीनी कूशच्या बोलण्यावरून याहवेहस गायलेले दावीदाचे शिग्गायोन.
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो;
जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा.
नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील;
मला सोडविण्यास कोणीही नाही म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
 
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल,
माझे हात सदोष असतील,
जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल,
माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—
तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत;
माझा जीव मातीत तुडवो
आणि माझे गौरव धुळीस मिळवो.
सेला
 
हे याहवेह, आपल्या रागाने उठा;
माझ्या शत्रूंच्या क्रोधाविरुद्ध उभे राहा;
जागे व्हा आणि न्याय्य निर्णय द्या.
उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता,
सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे.
याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत.
माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा.
हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा.
दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा
नीतिमानाला स्थिर करा—
तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा,
मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.
 
10 सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल*किंवा सार्वभौम आहेत,
जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.
11 परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत,
जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात.
12 दुष्टांनी आपले मार्ग बदललेकिंवा पश्चात्ताप केला नाही नाहीत,
तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील;
आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन
13 त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत;
आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत.
 
14 जे दुष्टपणाचा वेणा देतात,
ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात.
15 जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात
ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात.
16 त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते;
त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते.
 
17 याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन.
परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.

*स्तोत्र 7:10 किंवा सार्वभौम

स्तोत्र 7:12 किंवा पश्चात्ताप केला नाही