स्तोत्र 11
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.
1 मी याहवेहचा आश्रय घेतला आहे.
तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात:
“पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”
2 कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत,
त्यावर आपले बाण चढविले आहेत
की अंधारातून बाण मारून
सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.
3 जर पायाच नष्ट झाला,
तर नीतिमान काय करणार?
4 परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत;
याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत.
त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते;
पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.
5 याहवेह नीतिमानाला पारखतात;
परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे,
अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.
6 जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील;
आपल्या दाहक वार्याने
त्यांना होरपळून टाकतील.
7 कारण याहवेह नीतिमान आहेत,
न्यायीपण त्यांना प्रिय आहे;
जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.