स्तोत्र 12
संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. 
  1 याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत;  
विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.   
 2 प्रत्येकजण त्यांच्या शेजार्यांशी लबाड बोलतो,  
ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात  
परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.   
 3 खुशामत करणारे सर्व ओठ,  
आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.   
 4 ते बढाई मारतात आणि म्हणतात,  
“आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील,  
आम्हावर धनी कोण?”   
 5 याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत.  
म्हणून मी आता उठेन आणि  
त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”   
 6 शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे,  
सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे,  
याहवेहची वचने शुद्ध आहेत.   
 7-8 जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो,  
आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात.  
याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार  
आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.