स्तोत्र 13
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.
याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का?
किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?
मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे?
कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे?
कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?
 
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या.
या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.
माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,”
आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.
 
कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे;
माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
मी याहवेहची स्तुती गाईन,
कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.