स्तोत्र 52
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे.
1 हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस,
तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस,
तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?
2 तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे,
दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्यासारखी
विनाशाची योजना करीत असते.
3 तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा,
सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे.
सेला
4 अगे कपटी जिभे,
अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!
5 परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील;
तुझ्या डेर्यातून तुला ओढून बाहेर काढतील
आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील.
सेला
6 नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील;
ते त्याला हसतील व म्हणतील:
7 “पाहा, हा असा मनुष्य आहे
ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही
तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला
आणि दुसर्यांचा नाश करून तो बलवान झाला!”
8 परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील
जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे;
परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी
सदासर्वकाळ विसंबून आहे.
9 कारण तुम्ही जे काही केले
त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन.
आणि मी तुमच्या नावाची आशा करेन,
कारण तुमचे नाव चांगले आहे.